अनुदिनी ५० – Systematic Withdrawal and PPF

नमस्कार मंडळी!

काय, कुठे आहात?

अहो, म्हणजे काय झालं, मागे आपण वाचलं असेलच की आपले प्रेमळ त्रिकुट, ‘रश्मी-ऋषी-सन्नी’ गोव्याला गेले, म्हणून विचारलं. तुम्ही कुठे बाहेर पडलात की नाही?

मी तर आर्थिक नियोजनाच्या गप्पा मारुन, लिहून एकदम बोअर झालो की राव!

म्हटलं बुध्दी देवतेचा आशीर्वाद घ्यावा आणि तैलबुध्दी वृद्धिंगत करण्यासाठी मत्स्यआहाराचे हवन करावे; मग निघालो की राव! आपल्या कोकणात, ‘तुरळला.' तेथून पुढे ‘गणपतीपुळे’ आणि 'तारकर्ली' आणि मग परतीचा प्रवास!

हां! तर राव, आम्ही आधी विठोबा केला, म्हणजे आधी बाप्पांचे दर्शन घेतले मग पोटोबा करता तारकर्लीला वळलो.

तर, मंडळी! ‘तारकर्ली’ ऐकून, सॉरी वाचून आमच्या सारख्या मत्स्यप्रेमी खव्वयांची जीभ एकदम खवळली असेल!

काय बरोबर ना!

तर मंडळी हे सगळं सांगायचं कारण की, हे आर्थिक नियोजन वगैरे सगळं करायचं कशाला तर, निवांतपणे हिंडता-फिरता यावं, मनासारखे चार पैसे खर्च करता यावेत म्हणूनच ना!

तर, त्या अनुषंगाने मागे मी गुंतवणुक करताना दरवर्षी एका ठराविक दराने जर गुंतवणूक वाढवत नेली तर ते कसे सोईस्कर आहे ह्याचा आपण ऊहापोह केला.

आणि मंडळी ते उदाहरण हे म्युच्युअल फंडातील SIP च्या संदर्भातील होते. आता म्युच्युअल फंडाचा विषय निघालाच आहे तर आपल्याला ‘SWP’ (Systematic Withdrawal Plan) ची कल्पना असेलच? नसेल तर पुढे त्या विषयी मी परत लिहीन पण ते आठवण्याचे कारण असे की PPF म्हणजे ‘सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत’ (Public Provident Fund) देखील आपण ‘SWP’ करु शकतो.

मंडळी, आजची मिलेनियम पिढी सर्वसाधारणपणे PPF च्या बाबतीत उदासीन आहे.

आणि आज त्यांचे जे मम्मी-पप्पा आहेत ते १९६०- १९७० मधील काळात जन्मलेले, त्यांनी त्यांच्या चाळीशीत ४ ते ५ हजारापासून सुरु झालेली सेन्सेक्सची घोडदौड बघितलेली आहे. त्यामुळे साहजिकच त्यांनी त्याचे म्हणजे मार्केटचे, म्युच्युअल फंडाचे बोट पकडले.पण, त्यांच्या आई-बाबांनी सांगितलं म्हणून PPF (Public Provident Fund) चे ही बोट पकडून ठेवले.

त्यांची PPF मधील गुंतवणूक ही समजून-उमजून नव्हती. वर्षभरात जमेल तसे, जमेल तेवढी आणि जमेल तेव्हा ते रक्कम गुंतवत; पण बरेच जण दिडलाख गुंतवणुकीचा कोटाही पूर्ण करत नसत.म्हणजे त्यांचे आई-बाबा म्हणाले म्हणून त्यांनी ते सुरु केलं, बस्स!

आजचे हे ‘मम्मी-पप्पा’ साठीच्या थोडं पुढे, थोडं मागे आहेत. त्यांच्याकरिता ह्या PPF पुराणातील SWP (Systematic Withdrawal Plan) चा भाग जो ‘मागच्यास ठेच पुढचा शहाणा’ म्हणजे पुढच्या पिढीस उपयोगी ठरू शकतो.

तर मंडळी! जर आपले PPF आपण १५ वर्षांनंतरही चालू ठेवले असेल तर प्रत्येक ब्लॅाकमधे (पाच वर्षाचा एक ब्लॅाक) मागील आर्थिक वर्षाच्या शिलकीच्या साठ टक्के रक्कम आपण काढू शकता.

त्यामुळे काय होईल?

शिलकीवरील व्याजही करमुक्त आणि काढलेली रक्कमसुद्धा करमुक्त!

आता, दिलेल्या तक्त्यावरुन आपल्याला PPF मधील SWPचा सहज अर्थबोध होईल.

*सध्याचा व्याजदर ७.१% आहे; पुढील १५ वर्षाकरता ६% गृहीत धरला आहे.

बरंय तर मंडळी ही अनुदिनी आपल्या पर्यंत पोहचेपर्यंत दिवाळीचे महत्वाचे दिवस साजरे करुन झालेले असतील. त्यामुळे आता रुचीपालट करायला मस्त फिरायला जायला हरकत नाही.

असो, तर मित्रांनो आपण काय कराल?

होता होईतो, PPF मध्ये एप्रिल १ ते ५ तारखेच्या दरम्यान पूर्ण दीड -लाख गुंतवा.

खाते परिपक्व झाल्यावर जमेल तेवढी वर्षे ते वाढवत चला.

कमीत कमी वर्षाला शंभर रुपये गुंतवणे आवश्यक.

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

एक दुपार ! - One Afternoon !

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

घर..घर ! Ghar..Ghar !

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'