अनुदिनी २८ - 'वय वर्षे ६०'
“अरे, क्लेम फाईल आणली का त्या देशपांड्यांकडून?” "जरा केस पेपर्स तपासून घ्या!" "जरा कॉम्प्लिकेटेड केस आहे!" अशोकराव आपल्या स्टाफला सूचना देत होते. हे आमचे अशोकराव, वय वर्षे ६० प्लस,पण एकदम टुणटुणीत,अजूनही धावत लोकल पकडणारे, मटणाची नळी फोडणारे. ह्यांची ऐन उमेदीची वर्षे ही नोकरी शोधण्यात आणि ट्रेन च्या प्रवासात गेली. वडिलांच्या नोकरीने दगा दिल्याने कुटुंबाची जबाबदारी अचानकपणे आणि थोडी लवकरच घ्यावी लागली.असलेल्या नोकरीत त्यांना राम, लक्ष्मण, सीता, कोणीच दिसेना. म्हणजे मंडळी, आमचे अशोकराव नोकरीत रमेनात. त्या शिफ्ट ड्युट्या,वेळी अवेळी जेवण,झोप आणि बदलणाऱ्या सुट्ट्या सगळेच अस्ताव्यस्त. योगायोगाने त्यांना व्यवसायात संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. थोड्याच कालावधीत आर्थिक स्तर उंचावला, राहणीमान सुधारले, मुलाचे शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण झाले आणि तोही त्यांना सामील झाला. बघता, बघता त्यांचे स्वतःचे कार्यालयही झाले. सर्वकाही उत्तम! अशोकरावांची गाडी रुळावर आली, त्यांना त्यांच्या कामात, जगण्यात लय सापडली पण ह्या उशिरा सापडलेल्या लयीत ज्या काही गोष्टी राहून गेल्या त्यात त्यांनी निवृत्ती नंतरच्या उत्पन्नाचा विचारच केला नाही. जरी स्वतःचा व्यवसाय असला तरी मंडळी त्यांना सुरक्षित, कायम स्वरूपी स्वतःकरता व त्यांच्या पत्नीकरिता पेन्शनची गरज भासू लागली. आणि मंडळी! आता स्थिरावलेल्या उत्पन्नामुळे आणि निवळलेल्या जबाबदाऱ्यांमुळे ते आता स्वतःकरिता विचार करू शकत होते. मग काय मंडळी वयाच्या साठीत हे शक्य आहे का? हो, शक्य आहे. कसे ते? जाणून घेऊ. म्हणजे जर अशोकरावांना स्वतःसाठी व त्यांच्या पत्नी साठी पेन्शन ची सोय करावयाची असल्यास ते 'National Pension System (NPS) ह्या योजनेत साठी नंतरही सहभागी होऊ शकतात. पुढील दहा वर्षे ते सदर योजनेत नियमित गुंतवणूक करून, सत्तरीला पेन्शन सुरु करून घेऊ शकतात. ते, 'Active Choice' ह्या पर्यायात त्यांच्या योगदानातील जास्तीत जास्त ७५% रक्कम समभागात गुतंवण्याचा पर्याय निवडू शकतात. ह्या व्यतिरिक्त, कलम 80 CCD (1B) च्या अंतर्गत अधिकतम ५०,००० च्या गुंतवणुकीवर करलाभ घेऊ शकतात , आणि मंडळी, हा करलाभ, कलम 80 C च्या १,५० लाखा व्यतिरिक्त असेल हे विशेष. मग, आपण कसली वाट बघत आहात? |
Comments
Post a Comment