अनुदिनी ५० – Systematic Withdrawal and PPF
नमस्कार मंडळी! काय, कुठे आहात? अहो, म्हणजे काय झालं, मागे आपण वाचलं असेलच की आपले प्रेमळ त्रिकुट, ‘रश्मी-ऋषी-सन्नी’ गोव्याला गेले, म्हणून विचारलं. तुम्ही कुठे बाहेर पडलात की नाही? मी तर आर्थिक नियोजनाच्या गप्पा मारुन, लिहून एकदम बोअर झालो की राव! म्हटलं बुध्दी देवतेचा आशीर्वाद घ्यावा आणि तैलबुध्दी वृद्धिंगत करण्यासाठी मत्स्यआहाराचे हवन करावे; मग निघालो की राव! आपल्या कोकणात, ‘तुरळला.' तेथून पुढे ‘गणपतीपुळे’ आणि 'तारकर्ली' आणि मग परतीचा प्रवास! हां! तर राव, आम्ही आधी विठोबा केला, म्हणजे आधी बाप्पांचे दर्शन घेतले मग पोटोबा करता तारकर्लीला वळलो. तर, मंडळी! ‘तारकर्ली’ ऐकून, सॉरी वाचून आमच्या सारख्या मत्स्यप्रेमी खव्वयांची जीभ एकदम खवळली असेल! काय बरोबर ना! तर मंडळी हे सगळं सांगायचं कारण की, हे आर्थिक नियोजन वगैरे सगळं करायचं कशाला तर, निवांतपणे हिंडता-फिरता यावं, मनासारखे चार पैसे खर्च करता यावेत म्हणूनच ना! ...