अनुदिनी ४२ - 'सिग्नल' / Blog 42 - 'Signal'
नमस्कार मंडळी! कसे आहात? आत्ता परवा शिळफाट्यावरून वाशीला चाललो होतो. शिळफाट्याच्या चौकाजवळ रहदारीमुळे गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. थोडा वेळ वाट बघितली आणि नंतर गाडी बंद करून शांतपणे आजूबाजूला बघत बसलो. थोड्याच अंतरावर १२ ते १५ वर्षांची २-३ मुले चाफ्याच्या फुलांचा छोटासा हार ट्रॅफिक मध्ये थांबलेल्या गाड्यांसमोर नाचवून विकायचा प्रयत्न करीत होती. तेवढ्यात एक लहान मुलगा हातात लहान स्प्रेची बाटली घेऊन पळत येताना दिसला, त्याच्याकडे छोटासा वायपर देखील होता. समोरच्या कारच्या ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या दाराची काच त्याने पटापट हातातल्या स्प्रेने पाणी मारून, वायपरने स्वच्छ केली आणि काचेवर नॉक करून त्याने पैसे मागीतले. त्या ड्रायव्हरने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण मग लगेच त्याने दुसऱ्या कारकडे धाव घेतली. काम करूनही मोबदला दिला जात नाही म्हणून कोणतेही आर्जव वा हुज्जत न घालता तो तडक नव्या उमेदीने दुसऱ्या गाडीकडे वळला होता. मंडळी बघायला गेले तर मुंबईतील कोणत्याही सिग्नलवर दिसणारे एक सर्वसामान्य दृश्य....