अनुदिनी ४६ –‘घालीन लोटांगण वंदीन चरण' / Blog 46 – ‘Ghalin Lotan Gan Vandin Charan’
"विसर्जनापूर्वी आरती म्हणून घ्या" इति नारायणराव. "घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहीन रूप तुझे" "देवा प्रेमे .... " "अच्युतम् केशवम् रामनारायणम् .... " भक्तमंडळींचा आवेश एकदम जोरदार, त्यात नारायणरावांचा तर भलताच जोरकस. स्वतःभोवती गिरक्या घेत असताना आजूबाजूचे, भवतालच्या विश्वाचे त्यांना अजिबात ध्यान नव्हते. "हरे राम, हरे राम, रामराम हरे हरे' च्या शेवटच्या ध्रुवपदावर एकदम गपकन खाली बसून त्यांनी बाप्पाला साष्टांग नमस्कार घातला. बाप्पाचे रीतसर विसर्जन झाले. मोठ्या भक्तीभावाने सर्वांनी बाप्पाला निरोप दिला. खिरापतीचे वाटप झाले. तेवढ्यात समोरून धोतर सोडून लेंगा-कुडता घालून नारायणराव हातात पिशवी घेऊन लगबगीने बाहेर निघाले. "अहो कुठे?" असं विचारता, "आता मत्स्य अवतारातील भगवंताला आणावयास निघालो." असे सांगून स्कुटीवरून बाहेर पडले देखील. हे नारायणराव, आता दोन वर्षांनी सत्तरी ओलांडतील. तुकतुकीत कांती, सडपातळ बांधा आणि तैलबुद्धी याचे श्...