अनुदिनी २३ - ‘चाय पे चर्चा -२’ 'Blog 23 - Chai pe Charcha - 2'
'चाय पे चर्चा -२' ठाणं, ठाणं, ठाणं!!!! संदिपच्या फ़ॅब्रिकेशनच्या वर्कशॅाप मध्ये पोहोचलो. संदिपने नुकतेच हे वर्कशॅाप सुरू केले होते. आजूबाजूला ३-४ कामगार कामात व्यग्र होते. वेगवेगळे आवाज आणि फ़ॅब्रिकेशनचा गंध वातावरणात भरलेला होता. मी बाहेर संदिपच्या बोलाविण्याची वाट बघत होतो. तो फोनवर तावातावाने बोलत असल्याचे दिसत होते. माझ्याशी नजर मिळताच त्याने मला आत बोलावले. “हे बॅंकवाले काही ऐकायलाच मागत नाहीत. CC ची लिमीट वाढवून द्यायला काय नाटकं करतात ना! काय तर म्हणे तुमची बॅलन्सशीट बरोबर नाही," फोन ठेवत संदिप पुटपुटला. “बरं ते जाऊ दे! तू कसा आहेस” संदिपने एकदम ट्रॅक चेंज केला. “एकदम झक्कास मजेत! बरेच दिवस भेट नाही!” “हा! बरं झालं तू आलास ते, मला ह्या कामातून वेळच मिळत नाही. आत्ता ऐकलंस ना, ह्या CC च्या लिमिट करीता मागे लागू की उद्योगधंदा बघू?” “चहा घेशील ना!” “हो”! मी उत्तरलो. “थोडक्यात काय तर सध्या तुझी आर्थिक चणचण चालू आहे”. ...