अनुदिनी ६६ - पेन्शन.. पेन्शन / Blog 66 – Pension . . Pension

“ काय साहेब बऱ्याच महिन्यांनी येणं केलं ?" परेशची तंद्री भंगली हातातली चहाची बशी समोरच्या टेबलावर ठेवत त्याने नजर वर केली , तर सरपंच बाळासाहेब समोर उभे. " या बाळासाहेब या बसा". इति परेश. “ अहो आमच्याकडे निवांतपणा हा क्षणभर सुद्धा राहिलेला नाही. एखादा क्षण जरी मिळाला की लगेच खिशातल्या मोबाईल कडे हात जातो.” खिशातून सिगरेट काढत परेशने हसत हसत बाळासाहेबांसमोर हात धरला. “ बाकी आपलं गाव एकदम आहे तसंच आहे!” “ अहो , नाही राव! बराच बदल झालाय! पण विशेष म्हणजे गावातले व्यवहार गावातल्याच आवेशात होतात , त्यात शहरीपणा शिरला नाही. म्हणजे गावातल्या बायकांना नदीवर जाऊन कपडे धुवायला आवडतं म्हणून खास घाट बांधला. तुमचा तो कुठला बँड कम्प्युटरला जोडावा लागतो तो ?” बाळासाहेबांनी सुपारीच खांड तोंडात टाकता टाकता विचारणा केली. “ हा! ब्रॉडबँड कनेक्शन म्हणताय ?” “ बरोबर!” “ तर तोही ग्रामपंचायतीतर्फे मोफत उपलब्ध करून दिलाय. सर्व घरातील मसाला गावच्या चक्कीतून मोफत कांडून दिला जातो. अख्या जिल्हयात आदर्श गाव म्हणून पुरस्कार मिळालाय की राव!” सरपंचांनी हातातली चंची ल...